तुझी डायरी गझल

 आर्त मनाने गाणे म्हणते तुझी डायरी

तुला माहिती नाही रडते तुझी डायरी

जेव्हा अपुले भांडण होते.. तू रुसल्यावर
आधाराला सोबत असते तुझी डायरी

नैराश्याला दुखणे माझे  व्यक्त व्हावया
डोळ्यासमोर माझ्या नसते तुझी डायरी

आठवणींना चाळत बसतो पानोपानी
काळासोबत मजला छळते तुझी डायरी

तुझे वायदे,खोट्या शपथा नकोस सांगू
रोज नव्याने..दोषी ठरते तुझी डायरी

माझ्या जखमा माझे अश्रू लपवत असतो
तुझ्यासारखी खपली धरते तुझी डायरी

येता जाता तुझी आठवण काढत बसतो
मध्यस्थी मग रुसते फुगते तुझी डायरी

दोघांमध्ये कमीच होते बोलणे जरी
दुराव्यास या कारण ठरते तुझी डायरी

इथे स्वतःला जगणे अवघड तू नसतांना
दुःख बिचारे फक्त समजते तुझी डायरी

- पवन तिकटे