लेक सासरला जाता

 लेक सासरला जाता

दुःखी पाकळी फुलात
वेली विना सुन्या भिंती
लेक सासरला जाता
रडे तुळस एकांती ||१||


रडे तुळस एकांती
संगे बागेतली फुलं
गुंजे नाद पैंजणांचा
मुकी कानातली डुलं ||२||


मुकी कानातली डुलं
ओठी माहेराची गाणी
लेक निघता सासरी
डोळा ओथंबले पाणी ||३||


डोळा ओथंबले पाणी
झाला पोरका ह्यो मळा
लेकी विना झुलतोय
नाग पंचमीचा झुला ||४||


नाग पंचमीचा झुला
लेक कोरीव गोंदण
याद यावी माहेराची
लेकी तुळस आंदण ||५||


लेकी तुळस आंदण
कन्यादान सावरत
आला घेऊन सोंगाड्या
माहेराचा रुखवत ||६||


माहेराचा रुखवत
हिर्व्या रंगाने गडद
अशी सजली मांडवी
तुझ्या अंगाची हळद ||७||


तूझ्या अंगाची हळद
मुक्या आठवांचा मार
रड लेकी रड आता
कर हलकासा भार ||८||


No comments:

Post a Comment